Ad will apear here
Next
गुरू परमात्मा परेशु...
सुरेश वाडकर

अत्यंत गोड आणि भारदस्त आवाज, तार सप्तकाबरोबरच खर्जातही लीलया फिरणारा गळा, सुरात लावलेल्या तानपुऱ्याच्या झंकारातून येणाऱ्या सुरेल स्वरांसारखा अत्यंत सुरेल स्वर, नवनिर्मितीची असणारी प्रचंड क्षमता ही ज्यांची गुणवैशिष्ट्यं सांगता येतील, ते लोकप्रिय गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने, त्यांचे एक शिष्य किरण काळे यांनी त्यांच्याबद्दल पूर्वी लिहिलेला लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
..............................
जानेवारी २००२ची गोष्ट आहे. त्यावेळी माझी बारावीची परीक्षा जवळ आली होती. तयारी सुरू होती. माझे वडील गुलाबराव काळे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्यांचा एकूणच राज्यात मोठा जनसंपर्क आणि मित्र परिवार आहे. स्व. महादेव शेलार (मुंबई) हे तेव्हा नगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक होते. वडिलांनी १९९९ची नगर-नेवासा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसची मिळत असलेली उमेदवारी नाकारली असली, तरी त्यांची काँग्रेस पक्षातील सक्रियता कायम होती. 

स्व. महादेव शेलार आणि माझ्या वडिलांची अनेक वर्षांची असणारी जिव्हाळ्याची मैत्री मला माझे गुरुजी सुरेश वाडकर यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कारणीभूत ठरली. जानेवारी २००२मध्ये पक्षाच्या कामानिमित शेलार काकांचा नगर दौरा होता. त्यांच्यासाठी आमच्या घरी खास काळे घराण्याच्या पद्धतीचा जेवणाचा बेत आखण्यात आला होता. नेहमीप्रमाणे वडिलांनी मला कौतुकाने हार्मोनिअमसमोर बसवले आणि गायला लावले. शेलार काकांचा स्वभाव रसिक, त्यामुळे सुमारे तासभर मैफल चालली. त्यांनी भरभरून दाद दिली. खूप कौतुक केले. 

त्यांनी, ‘मला किरणला मुंबईला न्यायचे आहे’, असे वडिलांना सांगितले. ते असे का म्हणत आहेत हे सुरुवातीला आमच्या लक्षात येईना. मग त्यांनी उलगडून सांगितले. माझा बालमित्र आहे. तो मोठा गायक आहे. मला वाटते किरणने त्याच्याकडे गाण्याचे पुढील शिक्षण घ्यावे. मोठा गायक, मुंबईला, बालमित्र... या सगळ्यामुळे माझी मात्र उत्सुकता वाढली होती. मी भीत-भीतच विचारले, ‘त्यांचे नाव काय आहे?’. ते म्हणाले, सुरेश वाडकर. आमचा कुणाचा क्षणभर विश्वासच बसला नाही. कारण सुरेशजींची अनेक गाणी मी लहानपणापासून गात होतो. त्यांच्या रेकॉर्डस् ऐकून एकलव्याप्रमाणे साधना करत होतो. कधी स्वप्नातही वाटले नव्हते, की त्यांच्यापर्यंत जाण्याची संधी आयुष्यात अशी कधी चालून येईल. 

१२वी बोर्डाची परीक्षा एव्हाना व्हायची होती. शेलार काकांच्या मुंबई निमंत्रणामुळे अभ्यासातले लक्ष जरा कमीच झाले होते. गाण्यासाठीच्या असणाऱ्या पॅशनमुळे तसे होणे स्वभाविकच होते म्हणा. एकदाची परीक्षा संपली आणि तडक मुंबई गाठली. शेलार काका मुलुंडला राहत असे. त्यांना त्यांच्या घरून घेतले आणि ‘आजीवासनच्या’ दिशेने कूच केले. उत्कंठा शिगेला पोहोचली होती. तसेच दडपणही वाढले होते. एवढ्या मोठ्या गायकासमोर गाऊन दाखवायचे होते. मनात अनेक विचार रेंगाळत होते. सुरेशजींना आपले गाणे आवडेल का? ते आपल्याला शिकवायला तयार होतील का? असे अनेक प्रश्न माझ्यात मनात घर करू लागले होत. 

डावीकडे वळत गाडी आजीवासनच्या गेटमधून आत शिरली. शेलार काकांनी सुरेशजींची आधीच वेळ घेतलेली असल्यामुळे थेट घरात प्रवेश मिळाला. सुरेशजींना नतमस्तक होऊन नमस्कार केला. धन्य झाल्यासारखे वाटले. शेलार काकांनी परिचय करून दिला. सुरेशजींनी काहीतरी गाऊन दाखव अशी सूचना केली. त्यावेळी संदीप खरेंच्या ‘दिवस असे की’ अल्बमची गाणी तरुण वर्गांत खूप लोकप्रिय होती. मीही खरेंच्या कवितांच्या अक्षरश: प्रेमात होतो. नगरमध्ये जाहीर कार्यक्रमांतून मी या अल्बममधील अनेक गाणी त्यावेळी गात असे. याच अल्बममधील ‘कसे सरतील सये...’ हे गीत मी सुरेशजींना ऐकवले. मनावर मोठे दडपण होतेच, पण बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. सुरेशजींकडे शिकण्याची संधी मिळेल की नाही याविषयी मनात गोंधळ सुरू होता. सुरेशजींनी गाणे ऐकल्यावर सांगितले, की ‘उद्यापासून सकाळी नऊ वाजता येत जा’. सुरेशजींनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारले आहे, हे ऐकून आकाश ठेंगणे झाले होते. खूप आनंद झाला होता. 

मग खरी धावपळ सुरू झाली. कारण आम्ही नगरहून मुंबईला एका दिवसाच्याच तयारीने गेलो होतो. अंगावर असणाऱ्या कपड्यांव्यतिरिक्त दुसरा ड्रेसही त्यावेळी सोबत नेलेला नव्हता. मुंबईसारख्या मायानगरीत राहायचे कुठे हा तर सगळ्यात मोठा प्रश्न होता. पण म्हणतात ना, की एखादी गोष्ट जुळून यायची असेल, तर ती सगळ्या बाजूंनी जुळून येते. वडिलांनी निर्णय घेतला, की आता किरणची मुंबईत सगळी सोय लावूनच परत जायचे. मला नगरला न्यायचे नाही. शेलार काकांनी पुन्हा एकदा मन मोठे केले. खर तर त्यांचा स्वभाव अत्यंत दिलदार असाच होता. मुळचे सातारचे असणाऱ्या शेलार काकांचे बालपण सुरेशजींच्या बरोबर लोअर परेलच्या डीलाईल रोडवर असणाऱ्या वाणी चाळीत गेले होते. याच डीलाईल रोडवर सीताराम मिलसमोर असणाऱ्या शिवशक्ती पार्क बिल्डिंगमध्ये त्यांचा एका खोलीचा फ्लॅट होता. त्यांनी लगेच या फ्लॅटची चावी हातात टेकवली. राहण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. वडिलांनी एक ड्रेस बाजारातून विकत घेऊन दिला. दोनच दिवसांत नगरहून परत येऊन माझी सामानाची ट्रंक मला पोहोच केली.

दुसऱ्याच दिवशी माझा दिनक्रम सुरू झाला होता. शेलार काकांच्या फ्लॅटमध्ये माझ्या आधीपासून राहणारा त्यांच्या सातारच्या बहिणीचा भाचा नथुरामला काकांनी मला मुंबईची ओळख करून देण्यासाठी सोबतीला दिला होता. नथुरामने मला लोअर परेल स्टेशन दाखवले. शिवशक्ती पार्कवरून लोअर परेल स्टेशनकडे जाताना वाणी चाळ रस्त्यातच असल्याची माहिती मला नथुरामने दिली. ज्या चाळीत सुरेशजींचे बालपण गेले होते त्या वाणी चाळीत पाऊल ठेवण्यापूर्वीच माझे या चाळीशी एक नाते निर्माण झाले होते. मला या चाळीत जाण्याची उत्सुकता लागली होती. सुरेशजी आणि त्यांचे मोठे असणारे संपूर्ण कुटुंब ज्या खोलीत अनेक वर्ष राहिले ती खोली पाहण्याची मला ओढ लागली होती. पण सुरेशजींकडचा पहिलाच दिवस असल्याने वेळेवर पोहोचायचे होते. संध्याकाळी वाणी चाळीत जाऊच असे मीच नथुरामला सांगितले, नव्हे त्याच्याकडून तसे कबुलच करून घेतले आणि मग आम्ही स्टेशनकडे निघालो. 

सकाळची वेळ होती. मुंबईच्या इतर भागातून यावेळी लोक चर्चगेट, व्हीटीकडे मोठ्या संख्येने प्रवास करत असल्यामुळे लोकलला तशी फारशी गर्दी नव्हती. सांताक्रूझ स्टेशनला उतरल्यानंतर बस पकडली. लिडो सिनेमा बस स्टॉपला उतरलो. आजीवसन समोरच होते. नथूरामने मला बिल्डिंगच्या खाली सोडले. मी सुरेशजी येण्यापूर्वीच रियाजाच्या खोलीमध्ये दाखल झालो होतो. कालच्यासारखे आजही मनावर दडपण होतेच. का कोण जाणे, पण हे दडपण कायम माझ्या मनावर राहिले. अगदी मी पुढे पुण्याला एमबीए करण्यासाठी येईपर्यंत. माझ्यावर सतत असणाऱ्या या दडपणाची सुरेशजींना कल्पना आली होती. पुढे सहा-सात महिन्यानंतर एकदा रियाजानंतर सुरेशजींनी मला वर त्यांच्या घरी बोलावले. मला असे का वाटते असे आस्थेवाईकपणे विचारले. ‘किरण तू तसे वाटून घेऊ नको, मोकळेपणाने वाग, बिनधास्त गात जा,’ असे समजावले. 

पहिला दिवस फारच छान गेला. सुरेशजींचा स्वर्गीय स्वर, आवाज, गाणे त्यांच्यासमोर बसून ऐकण्याचे भाग्य आजवर ज्या मोजक्या लोकांना मिळाले आहे त्यात आज माझाही समावेश झाला होता. कोणाचे लक्ष जाणार नाही, याची काळजी घेऊन मी स्वतःला हळूच चिमटा घेऊन हे स्वप्न तर नाही ना याची खात्री करून घेतली होती. मार्च २००२पासून पुढे मार्च २००५पर्यंत, म्हणजे जवळपास तीन वर्षे हा स्वर्गीय अनुभव मी रोजच घेत होतो. शिकण्याचा, वेचण्याचा प्रयत्न करत होतो. एक-एक दिवस, एक-एक क्षण सोनेरी क्षणासारखा जगत होतो, साठवत होतो. माझ्या आयुष्यातील हा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ होता. 

सुरेशजींकडे गाणे शिकणे सुरू असताना मी मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षणही पूर्ण करत होतो. कुठलीही गोष्ट सुरेशजींना विचारल्याशिवाय करायची नाही, हे पक्के ठरवून टाकले होते. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे चर्चगेट स्टेशनजवळ सेंटर आहे. त्यावेळी सुप्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर हे त्या केंद्रात अध्यापनाचे काम करत होते. सुरेश भटांची सुरेशजींनी गायलेली गझल ‘मला गाव जेव्हा दिसू लागले...’ मी गाताना ठाकूर सरांनी ऐकली होती. त्यांनी मला केंद्रात प्रवेश घेण्यासाठी आग्रह केला. मुंबईला जाण्यापूर्वी नगरला मी गंधर्व महाविद्यालयाच्या हार्मोनिअम, गायन आणि तबल्याची प्रवेशिका पूर्ण पर्यंतच्या परीक्षाही दिलेल्या होत्या, पण आजीवसनला दाखल झाल्यानंतर मी सुरेशजींना सोडून कुठेही गेलो नाही. माझा दिवस सुरू व्हायचा तो सुरेशजींच्या स्वरांनी आणि मावळायाचा तो ही त्यांच्याच सुरांनी. 

सुरेशजींच्या सगळ्या हिंदी-मराठी गाण्यांच्या रेकॉर्डस् मी अल्पावधीत संकलित केल्या होत्या. दादर पश्चिमला महाराष्ट्र ग्रामोफोन कंपनीतल्या मंडळींनी मला आत येताना पाहिलं, की ते लगेचच सुरेशजींची मी ऑर्डर दिलेली एखादी दुर्मीळ रेकॉर्ड काढून माझ्या हातावर ठेवत असत. या दुकानाशी पुढे माझे ऋणानुबंध निर्माण झाले. कारण महिन्यातून अनेक वेळा मी दादरला प्लाझा सिनेमाच्या बस स्टॉपवर उतरून या दुकानात गुणगुणत पायी जात असे आणि वेगवेगळ्या रेकॉर्डस् विकत घेत असे. सुरेशजींवर अनेक गायकांचा प्रभाव आहे, पण काही गायकांचा विशेष प्रभाव आहे. अगदी नावच घ्यायची झाली, तर लता मंगेशकर, उस्ताद अमीर खॉं, उस्ताद बडे गुलाम अली यांचा विशेष प्रभाव त्यांच्यावर आहे. गझलचे बेताज बादशाह मेहंदी हसनच्या रेकॉर्डस् सुरेशजींनी तासनतास ऐकल्या आहेत. घरी, प्रवासातही ते सतत ऐकत असतात.  

सात ऑगस्टला सुरेशजींचा वाढदिवस असतो. मी त्यांच्याकडे गाणे शिकत असतानाचा पहिला वाढदिवस आला त्यावेळी त्यांना काय भेट द्यायची, या विचारात माझ्या तीन-चार रात्री तर नक्कीच गेल्या असतील. शेवटी महाराष्ट्र ग्रामोफोन कंपनीतून मी मेहंदी हसन, उस्ताद अमीर खॉं, उस्ताद बडे गुलाम अली यांच्या जवळपास पंधरा-सोळा रेकॉर्डस् विकत घेऊन त्यांचा एक सेट तयार केला आणि त्यांना भेट दिला. सुरेशजींनी हे काय आहे म्हणून विचारले, तर मी त्यांच्यासाठी आणलेल्या रेकॉर्ड्सची नावे त्यांना सांगितली. ते म्हणाले, ‘माझ्याकडे या रेकॉर्ड्स आहेत. या तूच ठेव आणि ऐक. वारंवार ऐक. गाणाऱ्याने खूप ऐकले पाहिजे.’ यामुळे माझ्या कलेक्शनमध्ये अचानक पंधरा-सोळा रेकॉर्ड्सची भर पडली. जणू काही सुरेशजींनीच त्या रेकॉर्डस् मला री-गिफ्ट केल्या आहेत असे समजून मी त्या असंख्य वेळा ऐकल्या. त्यांचा मला गाण्यात खूप उपयोग झाला. 

आजही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील बहुसंख्य संगीत रसिकांना सुरेशजींच्या शास्त्रीय गायनाच्या बैठकींबद्दल कल्पना नाही. सुरेशजींची हिंदी-मराठी सिनेगीते, भजने, भावगीतांचा एक फार मोठा चाहता वर्ग समाजात आहे. त्यांनी सुरेशजींना शास्रीय गाताना ऐकलेलेच नाही. किंबहुना ‘अभिनव’ या एकमेव रेकॉर्डचा अपवाद सोडला, तर त्यांच्या शास्रीय गायनाच्या इतर रेकॉर्डस् बाजारात उपलब्ध नसल्यामुळे ही तसे असेल, पण त्यांचा शिष्य म्हणून नाही तर एक संगीत साधक आणि संगीत रसिक म्हणून मी हे अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो, की आजमितीला भारतात शास्त्रीय गायनात नामांकित असणाऱ्या पहिल्या पाच गायकांमध्ये सुरेशजींचे स्थान हे वरच्या स्थानी आहे. 

अत्यंत गोड आणि भारदस्त आवाज, तार सप्तकाबरोबरच खर्जातही लीलया फिरणारा गळा, सुरात लावलेल्या तानपुऱ्याच्या झंकारातून येणाऱ्या सुरेल स्वरांसारखा अत्यंत सुरेल स्वर, नवनिर्मितीची असणारी प्रचंड क्षमता, गळ्यातून निघणाऱ्या दाणेदार-सफाईदार अशा ताना, मुरक्या, तसेच ठुमरी, टप्पा, नाट्य संगीत अशा उप शास्रीय गायन प्रकारांवर असणारे विलक्षण प्रभुत्व; या सगळ्यांमुळे सुरेशजींच्या एकूणच गान तपस्येला ईश्वरी स्पर्श आणि आशीर्वाद असल्याचा अनुभव त्यांचे चाहते आणि गान रसिक गेली अनेक दशके घेत आहेत. मी तर या सागरात याची देही याची डोळा असंख्य वेळा अखंड बुडून परमानंद घेतल्याचा माझा अनुभव आहे. 

स्वरांचा अभ्यास करताना गायकाने श्रुतींचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे असते. सामान्य कानांना श्रुतींमधील फरक समजू शकत नाही. यंत्राच्या साहाय्याने एखाद्या स्वराची तांत्रिकदृष्ट्या किती कंपने होतात हे कदाचित आभ्यासता येऊ शकेल, पण कोणत्याही यंत्राच्या साहाय्याशिवाय केवळ कानांनी त्या समजणे आणि गाताना प्रत्येक सुरांच्या त्या-त्या नेमक्या श्रुती गळ्यातून काढणे यावर सुरेशजींचे विलक्षण प्रभुत्व आहे. आम्हा शिष्यांना शिकवताना श्रुतींमधील फरक आणि योग्य श्रुतींच्या आधारे स्वर नेमका लावण्याचे तंत्र शिकवताना त्यांनी दाखवलेली प्रात्यकक्षिके शिष्यांच्या स्वर साधनेच्या प्रक्रियेत कायम अत्यंत महत्वपूर्ण राहिली आहेत. 

लय ही गाणाऱ्याच्या नसानसांत भिनलेली असावी लागते. ताल शिकता येऊ शकतो, पण लय ही शिकण्याची गोष्ट नव्हे, असे सुरेशजी नेहमी सांगतात. सुरेशजींच्या अनेक गीतांमधून, भजनांमधून आपल्याला सुरेशजींच्या लयीवर असणाऱ्या विलक्षण प्रभुत्वाची प्रचीती येते. सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमधील लयीचे खेळ रसिकांना वेगळा आनंद देतात. सुरेशजींनी खळे यांचे गायलेले ‘जेव्हा तुझ्या बटांना...’, तसेच ‘काळ देहासी आला...’, ‘देवाचिये द्वारी’ ही आणि अशी अनेक गायलेली गाणी ऐकताना आपल्याला याची प्रचीती येते आणि ती आपल्याला एक वेगळाच आनंद देते. 

संगीतात गुरूला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भारतीय संगीतात गुरू-शिष्य या नात्याला खूप पवित्र समजले जाते. संत कबीर सांगतात, की ‘गुरू बिन ग्यान न उपजै, गुरू बिन मिलै न मोक्ष’, संत एकनाथांनी लिहिले आहे, की ‘गुरू परमात्मा परेशु’. गुरूला परमेश्वराच्या स्थानी मानण्याची परंपरा भारतीय संगीतात आहे. आम्हा सुरेशजींच्या शिष्यांच्या आयुष्यात सुरेशजींच्या येण्याने आमच्या आयुष्यास परीसस्पर्शच झाल्याची भावना आहे. आमचे आयुष्य नुसते संगीत साधक म्हणूनच नाही, तर एक सजग आणि संवेदनशील माणूस म्हणून आम्हाला घडण्यासाठीदेखील ते कारणीभूत ठरले आणि आयुष्यभर पुरेल एवढी संगीताची आणि विचारांची शिदोरीही सुरेशजींनी आम्हा शिष्यांना दिली आहे. 

सुरेशजी लहान असताना नियतीने त्यांची गाठ त्यांचे गुरुजी आचार्य जियालाल वसंत यांच्याशी घडवून आणली. गुरुजींनी सुरेशजींना केवळ गाणेच नाही शिकवले, तर त्यांचे पालकत्वही स्वीकारले. मुंबईतल्या मुंबईत राहत असूनदेखील गान साधनेत कोणतीही कसूर नको म्हणून त्यांना आपल्याकडेच ठेवून घेऊन पुत्रवत प्रेम आणि आशीर्वाद दिले. गुरुजींच्या या आशीर्वादामुळे आणि मूळतःच परमेश्वराचा वरदहस्त असल्याने सुरेश वाडकर हे नाव संगीत विश्वात अढळस्थान निर्माण करू शकले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अर्थात यामध्ये त्यांनी केलेली निस्सीम साधना आणि मेहनत ही होतीच. 

या प्रवासात आणखी एक महत्त्वाची बाब घडली. प्रेम वसंत, ज्यांना आम्ही सर्वजण आदराने दीदी आणि सुरेशजी ‘मानी’ म्हणतात, त्यांनी गुरूजींनंतर सुरेशजींना कायम आशीर्वाद दिले. एक ताकद म्हणून त्या सुरेशजींच्या कायम पाठीशी उभ्या राहिल्या. नाती ही केवळ रक्ताचीच असतात असे नाही, तर ती प्रेमाचीही असतात. एकाच आईच्या पोटी जन्म घेतला नसला, तरीही सुरेशजी आणि दीदी यांच्या नात्यातील ओलावा आणि प्रेम हे निर्व्याज, निरपेक्ष आणि अत्यंत नितळ असे आहे. आज गुरूजींच्या नावाने चालविले जाणारे ‘आजीवसन’ म्हणजेच ‘आचार्य जियालाल वसंत संगीत निकेतनच्या’ उभारणीत आणि जगभर झालेल्या विस्तारामध्ये दीदींचे योगदान फार मोठे आहे. दीदी या उत्तम सतार वादक, संगीततज्ज्ञ तर आहेतच पण त्यांच्यामध्ये एक उत्तम प्रशासकदेखील आहे हे मी जवळून पाहिले आहे. त्यामुळेच आजीवसन गुरुकुल, आजीवसन साउंड्स, स्कूल आणि अनेक गोष्टी उभ्या राहू शकल्या आणि त्यांचा झपाट्याने मोठ्या प्रमाणावर विस्तार होऊ शकला. गुरू माता पद्मा (दीदी) वाडकर यांनीदेखील आम्हा शिष्यांना भरपूर प्रेम दिले. जीव लावला. यामुळेच आजीवसन हे आम्हा शिष्यांना कायम आमचे ‘घर’ वाटत आले आहे. 

आजीवसनमध्ये गाण्याचे शिक्षण घेत असतानाच आम्हा शिष्यांमधील एक कार्यकर्तादेखील विकसित झाला हे मला आवर्जून सांगितले पाहिजे. गुरुपौर्णिमा, वसंतोत्सव आणि गणेशोत्सव हे वर्षातील तीन कार्यक्रम मी शिकत असताना त्यावेळी फार मोठ्या स्वरूपात आणि उत्साहात आयोजित केले जायचे. आजही केले जातात. या कार्यक्रमांची तयारी करणे, म्हणजे एक धम्माल असायची अगदी. यामुळे भारतातीलच नाही, तर जगातील उत्तमोत्तम कलाकारांना फार जवळून ऐकायला, अनुभवायला मिळाले. सुरेशजींमुळेच गानकोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले, अभिताभ बच्चन, उस्ताद झाकिर हुसैन, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित रवी शंकर, हरिहरन, पंडित अजय चक्रबर्ती, अशोक पत्की, स्व. रवींद्र जैन, अनुप जलोटा, सोनू निगम या आणि अशा अनेक नामवंत कलाकारांना भेटण्याची संधी मिळाली. माझ्याकडे काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका पोहचविण्याचे काम असे. या निमित्ताने मला अनेक मोठमोठ्या कलाकार आणि अधिकारी यांच्या थेट घरी जावे लागे. मीही ही कामगिरी चोखपणे बजावत असे.  

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या एमईटी कॉलेजच्या (वांद्रे) सभागृहात एकदा पंडित भीमसेन जोशी यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. पंडितजींना गायकांचे गायक म्हणून संबोधले जाते. पंडितजी म्हणजे गाण्यातला बाप माणूसच. त्या वेळी सुरेशजींमुळेच मला पंडितजींना तानपुऱ्यावर साथ करण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्यच समजतो. 

सन २००२ ते २००५ दरम्यान मी सुरेशजींकडे शिकत असताना मला अनेक चांगले मित्र मिळाले. माझ्या या गुरू बंधू, भगिनी, मित्रगण यामध्ये स्वप्नील बांदोडकर, रविकांत त्रिपाठी, राहुल वैद्य, संपदा (ताई) बांदोडकर, अवधूत वाडकर, मंदार वाडकर, आरती दीदी, अमृता वाडकर, अवंती नेरुरकर, अमेय दाते, सबिहा खान, विनायक नेटके, मंगेश चव्हाण, राधिका जोशी, रितेश (पुटपर्ती) यांचा मी विशेष उल्लेख करेन. आजवर आजीवसनने महाराष्ट्राला आणि भारताला अनेक उत्तम गायक दिले आहेत. सुरेशजींच्या परीसस्पर्शामुळे अनेकांच्या आयुष्याचे आजवर सोने झाले आहे. अनन्या वाडकर (सुरेशजींची जेष्ठ कन्या), अपूर्वा भुसे, सौरभ वाखारे, शुभम वाखारे, पद्मनाभ गायकवाड अशी सुरेशजींच्या शिष्यांची नवीन पिढीदेखील ही परंपरा पुढे चालवीत आहे.   

माझे पदवी शिक्षण २००५मध्ये पूर्ण झाले. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी पुण्याला येण्याचा निर्णय घेतला. पुण्यात एमआयटी महाविद्यालयातून एमबीए (मार्केटिंग) करत असतानाही माझे गाणे शिकणे सुरू होतेच. पुढील शिक्षणासाठी मी पुण्याला जातोय म्हटल्यावर याबाबत जेव्हा सुरेशजींशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी खास पंडित शौनक अभिषेकी (पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे चिरंजीव) यांना फोन करून मी किरणला तुझ्याकडे पाठवतो आहे, असे मोठ्या मनाने सांगितले. शौनक दादांनी मला त्यांच्याकडे शिकण्याची संधी दिली. जितेंद्र अभिषेकी हे संगीतातील एक मोठे घराणे आहे. सुरेशजींमुळेच माझा या कुटुंबाशी जवळचा ऋणानुबंध तयार झाला. तो आजही कायम आहे.

सुरेशजींकडे शिकत असताना मी तसा मितभाषी होतो, पण पुढे काळाच्या ओघात हे अंतरही नाहीसे झाले. माझ्या मनावरील दडपण कमी झाले. आता माझा सुरेशजींसमवेत होणारा संवाद अधिक मोकळा झाला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो, की आजवर अनेक वेळा सुरेशजींचे पाय माझ्या घराला लागले. नगरमध्ये, माझ्या गावी सुरेशजी सहपरिवार आले. नगरला आल्यानंतर सुरेशजींसाठी आमच्या घरून मटणाच्या जेवणाची विशेष मेजवानी हमखास असतेच. तेही हक्काने याची फरमाईश करतात. माझ्या आईने, बायको स्नेहलने केलेल्या सुग्रास जेवणास ते मनापासून भरभरून दाद ही देतात. 

माझ्या थिंक ग्लोबल फाउंडेशन या सामाजिक संस्थेने २०१६पासून एक उपक्रम हाती घेतला. अहमदनगरच्या मातीने हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीला दिलेले अवलिया अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर, ज्यांना आम्ही आदराने आणि प्रेमाने ‘तात्या’ म्हणत असू, त्यांच्या स्मरणार्थ आम्ही ‘स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार’ सुरू केला. पहिला पुरस्कार सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले (मुंबई) आणि लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख (पुणे) यांना देऊन सन्मानित करण्यात आले होते. 

२०१७ सालचा दुसरा पुरस्कारार्थी निश्चित करण्यासाठी जेव्हा आमच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली, त्या बैठकीत सुरेशजींची पुरस्कारासाठी निवड करण्याचा प्रस्ताव सर्वांनी एकमताने ठेवून तो सर्वानुमते संमत केला. माझ्यासाठी ही जाहीर गुरूपूजनाची संधी होती. नगर शहरात डिसेंबर २०१७मध्ये मोठ्या दिमाखदार सोहळ्यात सुप्रसिद्ध सिने अभिनेते विक्रम गोखले यांच्या शुभहस्ते सुरेशजींना अनेक नामांकित मान्यवरांच्या आणि रसिक मायबाप नगरकरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान होत असताना मला धन्य झाल्यासारखे वाटले. विक्रम गोखले यांच्याविषयी मला यानिमित्ताने आवर्जून नमूद करावेसे वाटते, की अतिशय उच्च कोटीचा असणारा हा कलावंत अत्यंत साधा असून माणुसकी जपणारा आहे. चित्रपटाच्या चंदेरी दुनियेतील माणसे बहुदा दुसऱ्या ग्रहावरची असल्यासारखी वागतात, पण विक्रम गोखले मात्र याला अपवाद आहेत. सुरेश वाडकर या आपल्या मित्राचा आपल्या हातून आपल्याच दिवंगत मित्राच्या नावे पुरस्कार देऊन सन्मान होतोय म्हटल्यावर त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता, कार्यक्रमाला मी नक्की येणार अशी ग्वाही दिली होती. खरे तर हा पुरस्कार स्वीकारून सुरेशजींनी थिंक ग्लोबल फाउंडेशनचा सन्मान केला असेच मी म्हणेन. हा देखणा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी नगरकरांनी तोबा गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या वेळेच्या खूप आधीच सभागृह खचाखच भरून गेले होते. तोबा गर्दीमुळे ऐनवेळी सभागृहाबाहेर आम्हाला स्क्रीन आणि खुर्च्यांची व्यवस्था करावी लागली. सभागृहात असणाऱ्या रसिकांपेक्षाही जास्त संख्येने रसिक बाहेरून हा सोहळा अनुभवत होते.

प्रत्येकाचे प्रारब्ध हे नियतीने निश्चित करून ठेवलेले आहे अशी माझी श्रद्धा आहे. शिक्षणाबरोबरच सुरेशजींकडे मी गाणे शिकत असल्यामुळे अनेकांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक होते. परंतु मी गाण्यात करिअर करण्याचा मार्ग न निवडता राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम करीत मी महराष्ट्र पिंजून काढला, खूप मित्र कमावले. अल्पावधीतच या क्षेत्रात नाव कमविण्यात मी यशस्वी झालो असलो, तरी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. माझ्या या प्रवासात सुरेशजींच्या सदिच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असतील असा मला दृढ विशास वाटतो. 

सुरेशजींच्या ६३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने (२०१८) हा लेख लिहीत असताना मी पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये गेलो. या सगळ्या जुन्या आठवणींमुळे परत आजीवसनमध्ये परतल्याची अनुभूती आली. परत सर्व काही त्यागून सुरेशजींकडे शिकत राहावे आणि गात राहावे असे वाटते आहे. पण असे असले तरी नियती कुणाला चुकलेली नाही. नियतीने आधीच निश्चित करून ठेवलेल्या माझ्या डेस्टिनीच्या दिशेने माझा प्रवास सुरू आहे. जबाबदाऱ्या खूप वाढल्या आहेत. अखंडपणे चालत राहायचे आहे. कायम उत्तम करायचे आहे. माझ्या या प्रवासात सुरेशजींच्या सदिच्छा आणि आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर आहेत असा मला विश्वास आहे. परमेश्वर सुरेशजींना दीर्घ, निरोगी आणि उदंड आयुष्य देवो. अखेरपर्यंत त्यांच्या हातून गान सरस्वतीची आणि संगीताची अखंड सेवा घडत राहो अशी मी ईश्वर चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. 

- किरण काळे, अहमदनगर
मोबाइल : ९०२८७२५३६८ 
ई-मेल : unnatifoundation9@gmail.com

(लेखक थिंक ग्लोबल फाउंडेशन आणि उन्नती सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZVIBR
Similar Posts
लता मंगेशकर... एकाच आवाजातल्या अनंत भावच्छटा! लताबाईंच्या आवाजाला साध्या फूटपट्ट्या का लावता येत नाहीत? एकच आवाज शिळा, एकसुरी न होता, अनेक तपं आपल्यावर अधिराज्य गाजवतो, हे कसं शक्य झालं असावं? हा आवाज कधीच सगळ्यांसाठी सारखा भासला नाही... सगळ्या भावनांसाठी तो एकाच प्रकारे लावण्यात आला नाही... प्रत्येक भावनेचा त्या त्या व्यक्तिरेखेसाठी असलेला सूक्ष्म पदर त्या आवाजातून समोर आला
‘खेळता खेळता आयुष्य’ जगलेला कलावंत - गिरीश कार्नाड लेखन, नाट्यलेखन-दिग्दर्शन, चित्रपट दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रांत अत्यंत दर्जेदार कामगिरी केलेले प्रतिभावान कलावंत गिरीश कार्नाड यांचा १९ मे १९३८ हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या कामगिरीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप....
‘भारतरत्न’ घडविणारे ‘द्रोणाचार्य’ सचिन तेंडुलकर नावाचे विश्वपराक्रम गाजविणारे ‘भारतरत्न’ घडविणारे ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर सर यांचा दोन जानेवारी २०२० रोजी पहिला स्मृतिदिन आहे. सचिन तेंडुलकरबरोबरच आणखीही अनेक क्रिकेटपटू त्यांनी घडविले; पण त्यांचे वेगळेपण हेच होते, की त्यांनी जीवनाची मॅच कशी खेळायची याचेही धडे दिले. याच वेगळेपणामुळे त्यांचे खेळाडू उत्तुंग कामगिरी करू शकले
अष्टपैलू कलावंत - प्रा. मधुकर तोरडमल अभ्यासू लेखक, हुशार प्राध्यापक, चतुरस्र सिने-नाट्यकलावंत आणि असे कितीतरी पैलू व्यक्तिमत्त्वात असलेले प्रा. मधुकर तोरडमल ऊर्फ मामा यांचा २४ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेली ही नजर...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language